अर्थ:भगवंता ! ज्या तुझे ॐ हे मंगलकारक नाम आहे ,जो तू सर्व कार्यरूप सृष्टीच्या पूर्वी कारणरूपाने असतोस, वेदांनी ज्या तुझे एकाचेच अनेक रूपांनी वर्णन केले आहे, जो तू स्वसंवेद्य म्हणजे आपणच आपल्याला जाणणारा असून , दुसर्या कशानेही जाणला जाऊ शकत नाहीस,ज्या तुझा स्वसंवेद्य (सच्चिदानंद) रूपाने जयजयकार असून जो तू सर्व जीवांचे ठिकाणी आत्म्स्वृपानेही आहेस,त्या तुला नमस्कार करतो.||१-१||
विवरण:मंगलाचरण-ग्रंथारंभी भगवंताचे मंगलाचरण करावे असा शिष्टसंप्रदाय आहे.वेदादी वैदिक वांग्मय प्रमाण मानणाऱ्या लोकांना शिष्ट म्हणतात.मंगलाचरण ३ प्रकारचे असते-पहिले वास्तुनिर्देशरूप, दुसरे नमस्कार रूप व तिसरे आशीर्वादरूप मंगलाचरण.माउलींनी इथे तिन्ही प्रकारचे मंगलाचरण केले आहे.
ॐकार:नामरूपरहित ब्रम्हवस्तू अत्यंत सूक्ष्म व बुद्ध्यादिकांच्या पलीकडे असल्यामुळे, ती बुद्ध्यादिक वृत्तीने ग्रहण केली जात नाही. म्हणून ज्याप्रमाणे अत्यंत सूक्ष्म असा अरुंधतीचा तारा दाखविण्याकरता प्रथम अरुंधतीच्या ताऱ्याजवळ असलेला असा वसिष्टांचा तारा दाखविला जातो,त्याप्रमाणे नामरूप रहित निर्गुण ब्रम्हरूप वस्तू अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे तिच्या साक्षात्काराकरता शाश्राने स्थूल अशा ॐकाराला त्या ब्रम्हवस्तूचे वाचक (नाव) ठरविले आहे.व त्या ॐकाराचे ठिकाणी ब्रम्हभावना दृढ करून पुढे ॐकार अनुच्चारित झाला असता जीव ब्रम्हस्वरूप होतो.
ओंकारश्चाथ शब्दश्च द्वावेतौ ब्रम्हण: पुरा ।
कंठं भित्वा विनिर्यातौ तेन माड गिलकावुभौ ।।
'ॐ' कार व 'अथ' हे दोन शब्द ब्रम्हदेवाच्या कंठातून प्रथमच बाहेर पडले,त्यामुळे हे दोन्ही शब्द स्वभावतः मंगलकारक आहेत या अर्थाची वरील स्मृती आहे.याप्रमाणे ॐकार हा शब्द परमेश्वराचा वाचक व मंगलकारक असल्यामुळे माउलींनी ॐकार द्वारा सगुण व निर्गुण परब्रम्हाचे एकत्र मंगलाचरण केले आहे.
●आद्या: प्रत्येक कार्याला उपदान व निमित्त अशी दोन करणे असतात.कार्यरूप होणारे जे कारण असते ते उपदान कारण होय. उदा.मातीचा घडा होतो,म्हणून माती हे घड्याचे उपदान कारण आहे.कार्य निर्माण करणार्याला निमित्त कारण म्हणतात. कुंभार हा घडा निर्माण करतो म्हणून तो निमित्त कारण होय.जगातील प्रत्येक कार्याला उपदान व निमित्त अशी दोन करणे दिसून येत असली तरी जगद्रूप कार्याच्या पूर्वी एक चेतन परमात्माच असतो. म्हणून जगद्रूप कार्याला अशी दोन भिन्न करणे नसून, उपदान व निमित्त असे दोन्ही प्रकारचे कारण एक चेतन परमात्माच आहे.म्हणजे चेतन परमात्माच जगद्रूप झाला आहे व त्यानेच आपल्याला तसे जगद्रूप करून घेतले आहे. असा हा वेद सिद्धांत माउलींनी 'आद्या' या शब्दाने सुचविला आहे.
●वेदप्रतिपाद्या: म्हणजे वेदाने ज्याचे वर्णन केले आहे असा परमात्मा. वेदादी वांग्मयात कर्म, कर्मकर्ता जीव, स्वर्गादिक भोग्स्थाने, भोग इत्यादिकांचे वर्णन आले असले, तरी त्या सर्व नामरूपांनी केवळ एका परमेश्वराचेच वर्णन केले गेले आहे. हाच वेदांताचा अद्वैत सिद्धांत माउलींनी 'वेदप्रतिपाद्या'या शब्दाने मांडून , 'वेद्प्रतीपाद्य' अशा सगुण-भगवंताचा निर्देश करून सगुणवस्तूनिर्देशरूप मंगलाचरण केले आहे.
●स्वसंवेद्य : म्हणजे आपणच आपल्याला जाणणारा आत्मा ज्ञान स्वरूप असून तो ज्ञानरूप वृत्तीनेच जाणला जातो,अज्ञानिकाने जाणला जात नाही. हाच वेदांताच सिद्धांत असून तोच श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अनुभावामृतात प्रतीपादीला आहे व येथे 'स्वसंवेद्य' शब्दाने मांडला आहे.
●आत्मरुपा: याप्रमाणे ॐ काराचा वाच्य,सृष्टीच्या पूर्वी असणारा, सृष्टीचे कारण, वेदाने प्रतीपादिलेला व आपणच आपल्याला जाणणारा 'स्वसंवेद्य' असा हा परमेश्वर कोणता तर याचे उत्तर ज्ञानेश्वर माउलींनी 'आत्मरुपा' या शब्दाने दिले आहे.म्हणजे प्रत्येकाचा आत्मा तोच परमात्मा आहे. आत्म्याहून परमात्मा भिन्न नाही असा भाव.
आत्मा वा इदमेक एवाग्र आशीत |ऐत.२-१
पूर्वी हे जगत आत्मस्वरूप होते म्हणजे जगताच्या पूर्वी आत्मा होता.तोच नामरूपात्मक जगद्रूप झाला.याही श्रुती वचनावरून सर्व जगाला अधिष्ठानभूत असलेले चेतन म्हणजे परमात्मा,तो प्रत्येक देहाचे ठिकाणी अधिष्ठानभूत असलेले चेतन जो आत्मा ,याहून भिन्न नाही,एकच आहे असा अर्थ निघतो.
●नमो: या पदाने नमस्कार रूप मंगलाचरण केले आहे.जसे हरिपाठाच्या अभंगात,
चहूवेदी जाण साहि शास्त्री कारण | अठराही पुराने हरीशी गाती||
असे म्हणून माउली सर्व वेदशास्त्रात हरीची कीर्ती गायिली आहे असे सांगतात,तसेच येथेही 'आद्या', 'वेदप्रतिपाद्या', स्वसंवेद्या', आणि 'आत्मरुपा ' या पदांनी ज्ञानियांचे राजे केवलाद्वैत ब्रम्ह सिद्धांतच प्रतिपादन करीत आहेत. वरील विशेषणे ॐ काराला लागू शकत नाहीत म्हणून ओंकाराचे परमेश्वर भावनेने मंगलाचरण केले आहे असे म्हणणे वेदांतला धरून होणार नाही.
●जय जय राम कृष्ण हरी.....जय जय राम कृष्ण हरी....
अतिशय सुंदर शब्दात अर्थ सांगितला आहे,,
ReplyDeleteमनस्वी धन्यवाद,,
सुंदर विवेचन
ReplyDelete