॥ ॐ नमो भगवते जय जय वासुदेवाय ॥

नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी। एकतरी ओवी अनुभवावी॥

Thursday, February 2, 2012

देवा तूंचि गणेशु


देवा तूंचि गणेशु| सकलार्थमतिप्रकाशु| म्हणे निवृत्तिदासु| अवधारिजो जी ||१-२||

अर्थ: श्रीनिवृत्ती नाथांचे दास श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात,हे आत्मरुपा परमेश्वरा! माझ्या बोलण्याकडे लक्ष दे.वैदिक वाण्ग्मयातील संपूर्ण अर्थाच्या ज्ञानाचा प्रकाश किंवा स्फुरणस्वरूप असा जो गणेश तो तूच आहेस||१-२||
O Lord, you are Shri Ganesha, Who illumines all things and minds. So I, disciple of Nivriti, say, please give me your attention. ||1-2||

विवरण :
अवधारीजो जी-वैदिक वांग्मयात ज्ञानदात्री देवता गणेश समजली जाते.सर्व देवतांचे ठिकाणी जो काही शक्तीचा उद्बोध दिसून येतो ,तो सर्व माझ्याच शक्तीचा उद्बोध आहे असे भगवंतांनीच गीतेत 'गामाविष्य च भूतानी' इत्यादी श्लोकांनी सांगितले आहे.याला धरून या ओवीत बुद्धीत होणाऱ्या अर्थज्ञानाच्या स्फुरणाला गणेश देवता हे नाव दिले आहे.
आता ग्रंथारंभी त्या देवतेला नमस्कार करण्या करता तिच्या शरीराचे वर्णन करतात . ज्याप्रमाणे राजाचे ठिकाणी प्रजेचे नियमन करण्याची शक्ती निरनिराळ्या अधिकारी वर्गाचे रूपाने प्रगत होते,त्याप्रमाणेच परमेश्वराचे ठिकाणी सृष्टीचे नियमन करण्याची असलेली शक्ती ,गणेशादी अधिकारी देवतांच्या रूपाने सृष्टीकाली प्रगत होते.म्हणून ज्याप्रमाणे प्रजेचे नियमन करणाऱ्या अधिकारी वर्गाचे ठिकाणी मतिप्रकाश करण्याची जी शक्ती आहे ती मुळची परमेश्वराचीच जीवनानुग्रहकशक्ती असून ती गणेश या नामरूपाने प्रगत झाली असल्यामुळे परमेश्वरच गणेश होय,असा आपला अनुभवजन्य निर्धार श्री ज्ञानेश्वर महाराज "अवधारिजो जी"या शब्दाने व्यक्त करतात. हे परमेश्वरा ! सर्वांच्या मतीत यथार्थ ज्ञानाने स्फुरणारा गणेश तूच आहेस असे म्हणून माउलींनी सर्व श्रोतृवर्गाला यथार्थ ज्ञान होण्याकरता गणेशरूप परमेश्वराच्या आशीर्वादाची याचना केली आहे. हेच तिसऱ्या प्रकारचे आशीर्वादरूप मंगलाचरण होय.
श्रीकृष्णार्पनमस्तु ...

No comments:

Post a Comment