प्रमेय प्रवाळ सुप्रभ | द्वैताद्वैत तेची निकुंभ | सरिसेपणे एकवटती इभ | मस्तकावरी ||१-१७||
अर्थ:
तेजस्वी प्रवाळाप्रमाणे असणारे द्वैत आणि अद्वैत हि दोन प्रमेये हि त्या गणेशाची गंडस्थळे होत आणि तीच गणपतीच्या हत्तीच्या मस्तकावर सारखीच बरोबरीने राहिली आहेत.||१-१७||
विवरण:
... द्वैताद्वैत....एकवटती:-
द्वैत आणि अद्वैत हि प्रमेये परस्परांचा विरोध न येत गणेशाचे मस्तकावर गंड स्थळाप्रमाणे राहिली आहेत. या म्हणण्याचा भावार्थ असा कि वस्तू व वस्तूची शक्ती मिळून एक वस्तू होत असते.वस्तू व वस्तूची शक्ती या दोन निराळ्या वस्तू नसतात. म्हणून त्यांना यत्किंचित अलग करता येत नाही.
निकुंभ:-
कोणी म्हणतात कि या ओवीत 'निकुंभ' या शब्दाचे ऐवजी 'कुंभ' शब्द योग्य आहे; कारण 'निकुंभ' हा शब्द गंडस्थलवाचक नसून 'कुंभ'; हा शब्द गंडस्थळ वाचक आहे. परंतु येथे 'निकुंभ' हाच शब्द योग्य आहे. कारण 'कुंभ' हा शब्द गंडस्थलवाचक असला तरी त्या शब्दाने एकाच गंडस्थळाचा बोध होईल परंतु गणेशाच्या मस्तकावर दोन गंडस्थळे आहेत त्या दोघांचा बोध व्हावा म्हणून श्रीज्ञानेश्वर महाराजांनी गटवाचक 'नि' हा उपसर्ग 'कुंभ' या शब्दाला लाऊन 'निकुंभ' या शब्दाने दोन गंडस्थळांच्या गटाचा बोध करून दिला आहे.
=====श्री कृष्णार्पनमस्तु=====
No comments:
Post a Comment