॥ ॐ नमो भगवते जय जय वासुदेवाय ॥

नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी। एकतरी ओवी अनुभवावी॥

Saturday, July 7, 2012

मज अवगमलिया दोनी


मज अवगमलिया दोनी |मीमांसा श्रवणस्थानी | बोध मदामृत मुनी-| अली सेविती ||१ -१६ ||

अर्थ:
पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा या दोन मीमांसा गणेशाचे दोन श्रवण म्हणजे कान होत असे मला वाटते व त्यातील ज्ञान मोदक अमृत असून , मुनीरुपी भ्रमर त्याचे सेवन करतात.||१ -१६ ||
...
विवरण: पूर्वमीमांसा दर्शन व उत्तरमीमांसा दर्शन यांची उपमा श्रीज्ञानेश्वर महाराजांनी वर दिली असून पुन: त्यांची येथे कानाचे ठिकाणी उपमा देत आहेत. याचे कारण हे आहे कि , षडदर्शनांपैकी पूर्वदर्शन व उत्तरदर्शन हि दोन दर्शने अशी आहेत कि ज्यांचे दर्शन व मीमांसा असे दोन स्वतंत्र भाग पडतात . उपनिषदे हे उत्तरदर्शन असून कर्मयोग सांगणारे श्रौतस्मार्त ग्रंथ हे पूर्वदर्शन होय . या दोन्ही दर्शनातील नानाप्रकारचे जे वचनविरोध आहेत,त्यांचा परिहार करून त्यांची एकवाक्यता करणे व व्यवस्था लावणे , हा मिमांसेचा भाग होय. कर्मदर्शनात कर्मदेवता वगैरे प्रतिपादक जी वचने आहेत, त्यांचा विरोधपरिहार पुर्वमिमान्सेत
केला आहे आणि आत्मविषयक, ज्ञानविषयक , उपासनाविषयक वगैरे जी उपनिषदातील वचने आहेत त्यांचा विरोधपरिहार उत्तरमीमांसेत केला आहे. हि दोन दर्शने सोडून बाकीच्या न्यायादी दर्शनात विरोधपरीहाराचा संबंधच नसल्यामुळे त्या दर्शनाचे मिमान्साग्रंथ स्वतंत्र नाहीत. म्हणून षडदर्शनांची उपमा देताना, निरनिराळ्या यज्ञयागादी कर्माचे नुसते निरुपण करणाऱ्या ग्रंथाचा पूर्वदर्शन या शब्दाने उल्लेख करून उपनिषदांचा उत्तरदर्शन म्हणून उल्लेख केला गेला आहे व विरोधपरिहार करणारे पूर्वमीमांसा सुत्रग्रंथ व उत्तरमीमांसा सुत्रग्रंथ यांना मीमांसा तेथे संबोधिले आहे.
सूत्र ग्रंथांना देखील दर्शन म्हणून ( पूर्वमीमांसा दर्शन व उत्तरमीमांसा दर्शन ) संबोधण्यात येते . याचे कारण हे आहे कि या सूत्रग्रंथातदेखील मूळ दर्शन ग्रंथातील सिद्धांत देऊन त्यांची मीमांसा केली आहे. दर्शन ग्रंथांचे सिद्धांत त्यात असल्यामुळे त्यांना दर्शन म्हणतात व मीमांसा केली आहे म्हणून मीमांसा म्हणतात. अर्थातच त्यांची गणेशाच्या कानाला योग्य अशी स्वतंत्र उपमा दिली गेली आहे. मीमांसा ऐकल्या खेरीज बरोबर कर्मज्ञान किंवा ब्रम्हज्ञान होणार नाही.निरनिराळ्या कर्माने प्राप्त होणार्या स्वर्गादितील विषयसुखाच्या आसक्तीने मदांध झालेले मुनी कर्म ज्ञानाची मीमांसा करणारी पूर्वमीमांसा ऐकतात व ब्रम्ह्ज्ञानाने प्राप्त होणार्या आत्मसुखाच्या आसक्तीने मदांध झालेले विरक्त मुनी शुद्ध ब्रम्हज्ञान करून देणारी उत्तरमीमांसा ऐकतात.

=====श्री कृष्णार्पनमस्तु====

No comments:

Post a Comment