देखा विवेक तव सुविमळु | तोची शुंडा दंडु सरळु | जेथ परमानंदु केवळु | महासुखाचा ||१-१४||
अर्थ:
शुद्ध आत्मानात्म विवेक हाच गणेशाची सरळ शुंडा होय आणि तेथच परमानंद व महासुखाची प्राप्ती होते. विवेकाने प्राप्त होणारा साम्यभाव हा परमानंददायक आहे असा अर्थ.||१-१४||
विवरण:
... सांख्यशास्र विचाराने पुरुषप्रकृतीचा विवेक म्हणजे निराळेपणा झाला तरी त्या शास्रात प्रकृती हि स्वतंत्र निराळी वस्तू मानल्यामुळे द्वैत कायम राहते. तेथे प्रकृतीहून निराळा झालेला पुरुष उदासीन राहतो , म्हणून तो दुखातून सुटतो, असे जरी सांख्य शास्र मनात असले तरी ,
अनुकूल वेदनीयं सुखं | प्रतिकूल वेदनियं दु:खं ||
म्हणजे जे अनुकूल असते ते सुख आणि जे प्रतिकूल असते ते दु:ख अशा सुख-दु:खाच्या व्याख्या शास्रकर मानतात. उदासीनता हि काही सात्विक वृत्ती असली तरी प्रिय वृत्ती नव्हे. थोडी प्रतिकूल वृत्तीच आहे.
उदासीनो:रिवद्वर्ज्य:|
असे भागवतात म्हटले आहे.उदासीन म्हणजे मित्र नव्हे. म्हणून प्रकृती विषयी सांख्य विचाराने उदासीन झालेला पुरुष नी:शेष दु:खरहित होत नाही. वेदांतातील आत्मनात्मरुपी शुद्ध विवेकाच्या योगाने प्रकृती व तिचे कार्य संपूर्ण मिथ्या ठरवून म्हणजे त्याला स्वतंत्र आस्तित्व व वस्तुत्व मुळीच नाही असे कळून आल्यावर , मग "सरळ" म्हणजे समरस असा एक आत्माच उरतो .तेथे प्रतिकूल मानण्याजोगे किंवा उदासीन असण्याजोगे असे काहीच उरत नाही. उरलेला असा एक समरस आत्मा अत्यंत प्रिय अतएव अनुकूल असल्यामुळे त्याचे ठिकाणी जसेजसे चित्त स्थिर होईल तसतसा महासुखाचा किंवा परमानंदाचा अखंड लाभ होतो .
======श्री कृष्णार्पनमस्तु=====
No comments:
Post a Comment