॥ ॐ नमो भगवते जय जय वासुदेवाय ॥

नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी। एकतरी ओवी अनुभवावी॥

Saturday, July 7, 2012

तरी संवादू तोची दशनु



तरी संवादू तोची दशनु | जो समता शुभ्रवर्णू | देवो उन्मेष सुक्ष्मेशणु | विघ्नराजू ||१-१५||

अर्थ: सर्व दर्शनांची एकवाक्यता हाच गणेशाच्या मुखातील पांढरा शुभ्र एकसारखा समान असलेला दात होय. हा सर्व विघ्नांचा शास्ता असा गणेश , उन्मेष म्हणजे अद्वैत ज्ञानरूपी सूक्ष्मदृष्टी असलेला देव होय. ||१-१५||

... विवरण: येथे संवाद हा शब्द विसंवादीच्या विरोधी अर्थाने वापरला आहे . वैदिक षड्दर्शने वरवर विसंवादी म्हणजे भिन्नभिन्न मतांचे प्रतिपादन करणारी दिसत असली तरी ब्रम्हदृष्टीने त्यांची एकवाक्यता आहे असा अर्थ . रजस्तमोगुणी दर्शनाचा आग्रह सोडल्यास शुद्ध सत्वगुणात्मक समबुद्धीने त्यांची एकवाक्यता होते , हा 'जो समता शुभ्रवर्णु' या पद समुच्चयाचा भाव आहे.
प्रपंचाला जाणणारी स्थूल दृष्टी जीवाचे ठिकाणी असते. अत्यंत सूक्ष्म अशा परब्रम्हाला जाणणारी सूक्ष्म दृष्टी किंवा चरम म्हटली जाते. परमेश्वराचे ठिकाणी एक तीच सूक्ष्म दृष्टी असते, स्थूल दृष्टी मुळीच नसते म्हणजे जीवाला जसे जगाचे भान आहे तसे ते परमेश्वराला मुळीच नाही असा भाव. ज्ञानेश्वरीत श्री माउली म्हणतात,
तो सृजी पाळी संहारी | ऐसे बोलती जे चराचरी | ते अज्ञान गा अवधारी | पंडूकुमरा ||५-८२||
जगाची हे होय जाये | तो श्द्धीही नेणे ||५-७९||
'विघ्नराज' या शब्दाने आपल्या भक्ताची परमार्थ मार्गातील विघ्ने नाहीशी करण्याचे सामर्थ्य परमेश्वराचे ठिकाणी आहे , हे दाखविले आहे..

========श्री कृष्णार्पणमस्तु ========

No comments:

Post a Comment