॥ ॐ नमो भगवते जय जय वासुदेवाय ॥

नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी। एकतरी ओवी अनुभवावी॥

Saturday, July 7, 2012

एके हाती दंतु


एके हाती दंतु | जो स्वभावता खंडितु | तो बौद्धमत संकेतु | वार्तिकांचा ||१=१२||

अर्थ: गणेशाच्या एका हातात जो दात आहे तो बौद्धमताचे आपोआप [सहजलीलेने] खंडन करणारा वार्तिकांचा संकेत होय. ||१-१२||

... विवरण:
खंडित बौद्धमत:
श्रीगणेशाने [पतंजलीचे योगशाश्ररुपी] एका हातामध्ये 'दात' धारण केला आहे; कि जो मूळचाच मोडका आहे. तो दात म्हणजे [ वार्तिककारांच्या व्याख्यानाने ] बौद्धांचे शून्यमत-स्वभावतः खंडित असल्याचा जणू संकेतच आहे. [कारण पतंजली हे एक ईशतत्व अधिक मानीत असल्याने ते 'सेश्वरसांख्य' होत. या त्यांच्या एका वैशिष्ट्यावरूनच बौद्धांचा शून्यवाद स्वभावतः खंडित असल्याचे सूचित करण्यासाठीच जणू एका हातात खंडित दात धारण केला आहे.]
कुमारील भट्ट यांनी पूर्वमिमांसेवर तंत्रवार्तिक आणि श्लोकवार्तिक अशी दोन वार्तिके लिहिली आहेत.या दोन वर्तीकात आत्मा कर्ताभोक्ता आहे असे प्रतिपादन केले आहे. त्यामुळे बुद्धांच्या क्षणिकविज्ञान अत्मवादाचे व आत्मशून्यवादाचे अपोआप खंडन झाले आहे. कारण आत्मा कर्ता व भोक्ता असे जे वार्तिककाराने मानले आहे , त्याचा अर्थ असा होतो कि कर्मकर्त्यालाच त्याच्या कर्माचे फळ मिळणे न्याय प्राप्त आहे व कर्माचे फळ भोगण्याकरिता कर्मकर्ता स्थिर असावयास पाहिजे व तसाच तो स्थिर आहे या विधानाने बुद्धांच्या क्षणिकविज्ञानअत्मावादाचे व शुन्यामताचे अनायासेच खंडन होत आहे.
येथे बौद्धदर्शन जर घेतले तर षडदर्शनांपैकी एक वैदिकदर्शन [ पूर्वमीमांसा किंवा योगदर्शन ] उपमा दिल्यावाचून सुटून जाते . यास्तव या ठिकाणी वैदिक पूर्वमीमांसादर्शनच घेणे योग्य आहे.
"वार्तिकांचा" या अनेकवचनी पदाने तंत्रवार्तिक व श्लोकवार्तिक या दोन वार्तिकांचा येथे निर्देश आहे.

=======श्रीकृष्णार्पनमस्तु=======

No comments:

Post a Comment