॥ ॐ नमो भगवते जय जय वासुदेवाय ॥

नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी। एकतरी ओवी अनुभवावी॥

Saturday, July 7, 2012

तरी तर्कु तोची फरशु


तरी तर्कु तोची फरशु | नीतिभेदु अंकुशु | वेदांतु तो महारसु | मोदकू मिरवे ||१-११||
अर्थ:
सतर्क हा (गणेशाच्या) हातातील फरशु आहे , नीतिभेद हा अंकुश होय आणि वेदांत दर्शनातील प्रतिपाद्य विषय जो परमानंद तो गणेशाचे हातातील मधुर मोदक होय.||१-११||
विवरण :
... १-तर्कु तोची फरशु:
श्रीज्ञानेश्वर महाराजांनी प्रथम न्यायदर्शनाला गणेशाच्या हाताची उपमा देऊन त्यातील प्रतिपाद्य विषय जो सतर्क त्याला गणेशाच्या हातातील फरशुची उपमा दिली आहे, हि उपमा फार समर्पक आहे. वाटेमध्ये आड येणाऱ्या पदार्थांचा छेद करण्यासाठी जसा फरशुचा उपयोग केला जातो, त्याप्रमाणे अद्वैत ब्रम्हज्ञान संपादन करताना जे संशय उत्पन्न होतात किंवा आक्षेप घेतले जातात त्यांचा उच्छेद करून शुध्दब्रम्हविचार अंत:करणात ठसविण्याकरता वेदांत सतर्काची आवश्यकता मानली आहे.
2-नीतिभेदु अंकुशु :
नीतिभेद म्हणजे वैशेषिक दर्शन होय. या वैशेषिक दर्शनाला नीतिभेद म्हणण्याचे कारण असे कि नीती म्हणजे धर्म. पूर्वमीमांसा दर्शन व वैशेषिक दर्शन या दोघांनीही धर्माची व्याख्या केलेली आहे. पूर्वमीमांसा दर्शनाने,
चोदनालक्षणाअर्थो धर्म: |
'अमुक कर ' अशी आज्ञा हे वचनावरून धर्माचे लक्षण ठरविले. व वैशेषिक दर्शनाने थोड्या भिन्न रीतीने,
यतोभ्युदयनि:श्रेयससिद्धी: स धर्म: |
ज्याच्यापासून विषयसुख व मोक्ष सुख मिळते तो धर्म; अशी फलावरून धर्माची व्याख्या केली आहे.म्हणून वैशेषिकदर्शन नीतिभेद म्हणजे धर्मभेद किंवा भिन्न रीतीने धर्माची व्याख्या करणारे शास्र होय. या शास्राला ज्ञानेश्वर महाराजांनी गणेशाच्या हातातील अंकुशाची उपमा दिली आहे. याचे कारण असे कि वैशेषिकदर्शनाने जी धर्माची व्याख्या केली आहे तीत ज्या धर्माच्या योगाने अभ्युदय सिद्धी व निःश्रेयस सिद्धी होते तो धर्म अशी अट आहे. ज्या धर्माचरणाने निःश्रेयास अंतरेल व नुसता अभ्युदय साधेल , असे आचरण धर्मरूप नव्हे. येथे अभ्युदय साधताना निःश्रेयस अंतरणार नाही इकडे लक्ष दिले पाहिजे. असा हा धर्मभेद आहे व तो अंकुशाप्रमाणे कार्य करतो. अंकुशाच्या योगाने जसा माहूत हत्तीला वळवितो,तसा हा धर्मभेदही निःश्रेयासाला घातक अशा स्वैर वृत्तीपासून वळविणारा होतो.
३-वेदांतु तो महारसु:
वेदांत दर्शनाने परमानंदाची प्राप्ती होते , म्हणून त्या दर्शनाला गणेशाच्या हातातील मधुर अशा मोदकाची उपमा दिली आहे.
=======श्रीकृष्णार्पनमस्तु=======

No comments:

Post a Comment