॥ ॐ नमो भगवते जय जय वासुदेवाय ॥
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी। एकतरी ओवी अनुभवावी॥
आतां अभिनव वाग्विलासिनी| ते चातुर्यार्थकलाकामिनी|ते शारदा विश्वमोहिनी| नमिली मियां ||१-२१||... अर्थ:अपूर्व शब्द विलासाची जी परमेश्वर शक्ती, चातुर्यपूर्वक अर्थाची कला दाखविणारी, सर्व चौसष्ट कलेची श्रीमूर्ती व तशाच शब्द विलासामुळे जगाला मोह पडणारी अशी जी शारदा,तिला मी नमस्कार केला.||१-२१||
विवरण : शब्दाधीष्ठात्री जी शारदा देवता तिचे हे जग आहे. विधी निषेध आहे,बंध मोक्ष आहे, इत्यादी शब्दांनीच भ्रांती उत्पन्न केली आहे. जो जो शब्द जीव ऐकतो , त्या त्या शब्दाला परब्राम्हाहून निरनिराळ्या अर्थाची तो कल्पना करतो असा अर्थ.
वास्तविक पाहता श्रुती म्हणते विश्व हे केवल वाचारंभन म्हणजे शब्दमात्र आहे. म्हणजे नुसते शब्दच आहेत. शब्दांप्रमाणे अर्थ नाहीत. सर्व शब्दांचा अर्थ एक परमात्माच आहे. पण विचार न करणाऱ्या जीवाला या शब्दाने भ्रम उत्पन्न केला व निरनिराळ्या शब्दांचे अनेक अर्थ आहेत असे तो मानू लागला. म्हणून शब्दाधीष्ठात्री शारदेला 'विश्वमोहिनी' म्हटले आहे.
===श्री कृष्णार्पनमस्तु===
ॐ श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ।
हे तिन्ही एकवटले | तेथ शब्द्ब्रम्ह ते कवळले | ते मियां श्रीगुरुकृपा नमिले | आदिबीज ||१-२०||अर्थ :अकार, उकार, मकार ह्या तिन्ही मात्र ज्या ओंकारात एकरूप आहेत , त्या ओंकारात सर्व वैदिक शब्द्ब्रम्ह साठविले आहे . तो ओंकारच सर्व जगाचे 'आदिबीज' म्हणजे कारण असल्यामुळे श्रीगुरुकृपेने ते जाणून मी त्याला नमस्कार केला.||१-२०||... विवरण :आदिबीज-
मनोवाग्गोचार असे परब्रम्ह जाणण्याकरता वेदाने परब्रम्हाचे ओम हे नाव ठेवले,ते अ, उ, म असे तीन मात्रात्मक आहे. जगदुत्पत्तीपूर्वी परब्रम्हाचे ठिकाणी ओंकाराचे स्फुरण होऊन , परमात्मा ओंकारवाच्य होतो. नंतर ओंकाराच्या अ, उ, म अशा तीन मात्र प्रकट होऊन त्यातून सर्व नामरूपे प्रकट होतात व त्या प्रकट झालेल्या नामरूपाचे योगाने परमात्मा जगतरुपाला येतो . ज्याप्रमाणे पोळपाट , लाटणे, खुर्ची वगैरे गोष्टी एका लाकूड या पदार्थाचे केवळ नामृपांचा बदल होऊनच होतात, त्याप्रमाणे परब्रम्ह हे प्रकट झालेल्या विविध नाम रुपांमुळे अज्ञानी लोकांना फलद्रूप भासते. या सर्व नाम रूपांचा विस्तार ओंकारात प्रथम साठविलेला असतो, म्हणून ओंकार जगाचे 'आदिबीज' म्हणजे मूळ कारण होय. ===श्री कृष्णार्पनमस्तु===ॐ श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु
अकार चरण युगुल | उकार उदार विशाल |मकर महामंडल | मस्तकाकारे ||१-१९||अर्थ : अकार म्हणजे सर्व स्थूल नामरूपे हि गणपतीचे दोन चरण होत . उकार म्हणजे सर्व सूक्ष्म नामरूपे हि गणपतीच्या पोटाचे ठिकाणी आहेत आणि मकर म्हणजे नामृपांची अव्यक्तदशा हि गणपतीच्या विशाल मंडलाकार मस्तकाचे ठिकाणी होय.||१-१९||
===श्री कृष्णार्पनमस्तु===
ॐ श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु
उपरी वेदोपनिषदे | जिये उदारे ज्ञानमकरंदे | तिये कुसुमे मुगुटी सुगंधे | शोभती भली ||१-१८||
अर्थ: ज्यात उदार ज्ञानरुपी मकरंद म्हणजे मध भरलेला आहे व जी वेदांचा अंतिम भाग म्हटली जातात ती उपनिषदे गणेशाच्या मस्तकाच्या मुकुटाचे ठिकाणी अत्यंत शोभणारी सुगंधी फुले आहेत .||१-१८||विवरण :वेदातील मंत्र व ब्राम्हण यातील कर्मकांडाच्या भागात , यज्ञयागादिक क्रिया ..., देवता इत्यादिक भिन्न भिन्न पदार्थाला धरून व अनेक निषेधाने युक्त असे संकुचित ज्ञान आहे . पण उपनिषदातून जे ज्ञान सांगितले गेले आहे , ते सर्व भेद नाहीसे करून, मुंगीपासून ब्राम्हदेवापर्यंत अखिल चारचार पदार्थांचे ठिकाणी एक पूर्ण ब्रम्ह सृष्टीच उत्पन्न करून देते. म्हणून उपनिषदातील ज्ञानाला 'उदार' म्हणजे पदार्थमात्राला एकसारखे समदृष्टीने पाहणारे ज्ञान असे म्हटले आहे. व ज्ञानाने सर्व दु:ख नाहीसे होऊन पुढे परमसुखाची प्राप्ती होते. म्हणून त्या ज्ञानाला सुगंधित फुलातील गोड मधाची उपमा दिली आहे .
=====श्रीकृष्णार्पनमस्तु=====
प्रमेय प्रवाळ सुप्रभ | द्वैताद्वैत तेची निकुंभ | सरिसेपणे एकवटती इभ | मस्तकावरी ||१-१७||अर्थ:तेजस्वी प्रवाळाप्रमाणे असणारे द्वैत आणि अद्वैत हि दोन प्रमेये हि त्या गणेशाची गंडस्थळे होत आणि तीच गणपतीच्या हत्तीच्या मस्तकावर सारखीच बरोबरीने राहिली आहेत.||१-१७||विवरण:... द्वैताद्वैत....एकवटती:-
द्वैत आणि अद्वैत हि प्रमेये परस्परांचा विरोध न येत गणेशाचे मस्तकावर गंड स्थळाप्रमाणे राहिली आहेत. या म्हणण्याचा भावार्थ असा कि वस्तू व वस्तूची शक्ती मिळून एक वस्तू होत असते.वस्तू व वस्तूची शक्ती या दोन निराळ्या वस्तू नसतात. म्हणून त्यांना यत्किंचित अलग करता येत नाही.
निकुंभ:-
कोणी म्हणतात कि या ओवीत 'निकुंभ' या शब्दाचे ऐवजी 'कुंभ' शब्द योग्य आहे; कारण 'निकुंभ' हा शब्द गंडस्थलवाचक नसून 'कुंभ'; हा शब्द गंडस्थळ वाचक आहे. परंतु येथे 'निकुंभ' हाच शब्द योग्य आहे. कारण 'कुंभ' हा शब्द गंडस्थलवाचक असला तरी त्या शब्दाने एकाच गंडस्थळाचा बोध होईल परंतु गणेशाच्या मस्तकावर दोन गंडस्थळे आहेत त्या दोघांचा बोध व्हावा म्हणून श्रीज्ञानेश्वर महाराजांनी गटवाचक 'नि' हा उपसर्ग 'कुंभ' या शब्दाला लाऊन 'निकुंभ' या शब्दाने दोन गंडस्थळांच्या गटाचा बोध करून दिला आहे.
=====श्री कृष्णार्पनमस्तु=====
मज अवगमलिया दोनी |मीमांसा श्रवणस्थानी | बोध मदामृत मुनी-| अली सेविती ||१ -१६ ||अर्थ:पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा या दोन मीमांसा गणेशाचे दोन श्रवण म्हणजे कान होत असे मला वाटते व त्यातील ज्ञान मोदक अमृत असून , मुनीरुपी भ्रमर त्याचे सेवन करतात.||१ -१६ ||...
विवरण: पूर्वमीमांसा दर्शन व उत्तरमीमांसा दर्शन यांची उपमा श्रीज्ञानेश्वर महाराजांनी वर दिली असून पुन: त्यांची येथे कानाचे ठिकाणी उपमा देत आहेत. याचे कारण हे आहे कि , षडदर्शनांपैकी पूर्वदर्शन व उत्तरदर्शन हि दोन दर्शने अशी आहेत कि ज्यांचे दर्शन व मीमांसा असे दोन स्वतंत्र भाग पडतात . उपनिषदे हे उत्तरदर्शन असून कर्मयोग सांगणारे श्रौतस्मार्त ग्रंथ हे पूर्वदर्शन होय . या दोन्ही दर्शनातील नानाप्रकारचे जे वचनविरोध आहेत,त्यांचा परिहार करून त्यांची एकवाक्यता करणे व व्यवस्था लावणे , हा मिमांसेचा भाग होय. कर्मदर्शनात कर्मदेवता वगैरे प्रतिपादक जी वचने आहेत, त्यांचा विरोधपरिहार पुर्वमिमान्सेत
केला आहे आणि आत्मविषयक, ज्ञानविषयक , उपासनाविषयक वगैरे जी उपनिषदातील वचने आहेत त्यांचा विरोधपरिहार उत्तरमीमांसेत केला आहे. हि दोन दर्शने सोडून बाकीच्या न्यायादी दर्शनात विरोधपरीहाराचा संबंधच नसल्यामुळे त्या दर्शनाचे मिमान्साग्रंथ स्वतंत्र नाहीत. म्हणून षडदर्शनांची उपमा देताना, निरनिराळ्या यज्ञयागादी कर्माचे नुसते निरुपण करणाऱ्या ग्रंथाचा पूर्वदर्शन या शब्दाने उल्लेख करून उपनिषदांचा उत्तरदर्शन म्हणून उल्लेख केला गेला आहे व विरोधपरिहार करणारे पूर्वमीमांसा सुत्रग्रंथ व उत्तरमीमांसा सुत्रग्रंथ यांना मीमांसा तेथे संबोधिले आहे.
सूत्र ग्रंथांना देखील दर्शन म्हणून ( पूर्वमीमांसा दर्शन व उत्तरमीमांसा दर्शन ) संबोधण्यात येते . याचे कारण हे आहे कि या सूत्रग्रंथातदेखील मूळ दर्शन ग्रंथातील सिद्धांत देऊन त्यांची मीमांसा केली आहे. दर्शन ग्रंथांचे सिद्धांत त्यात असल्यामुळे त्यांना दर्शन म्हणतात व मीमांसा केली आहे म्हणून मीमांसा म्हणतात. अर्थातच त्यांची गणेशाच्या कानाला योग्य अशी स्वतंत्र उपमा दिली गेली आहे. मीमांसा ऐकल्या खेरीज बरोबर कर्मज्ञान किंवा ब्रम्हज्ञान होणार नाही.निरनिराळ्या कर्माने प्राप्त होणार्या स्वर्गादितील विषयसुखाच्या आसक्तीने मदांध झालेले मुनी कर्म ज्ञानाची मीमांसा करणारी पूर्वमीमांसा ऐकतात व ब्रम्ह्ज्ञानाने प्राप्त होणार्या आत्मसुखाच्या आसक्तीने मदांध झालेले विरक्त मुनी शुद्ध ब्रम्हज्ञान करून देणारी उत्तरमीमांसा ऐकतात.
=====श्री कृष्णार्पनमस्तु====
तरी संवादू तोची दशनु | जो समता शुभ्रवर्णू | देवो उन्मेष सुक्ष्मेशणु | विघ्नराजू ||१-१५||अर्थ: सर्व दर्शनांची एकवाक्यता हाच गणेशाच्या मुखातील पांढरा शुभ्र एकसारखा समान असलेला दात होय. हा सर्व विघ्नांचा शास्ता असा गणेश , उन्मेष म्हणजे अद्वैत ज्ञानरूपी सूक्ष्मदृष्टी असलेला देव होय. ||१-१५||... विवरण: येथे संवाद हा शब्द विसंवादीच्या विरोधी अर्थाने वापरला आहे . वैदिक षड्दर्शने वरवर विसंवादी म्हणजे भिन्नभिन्न मतांचे प्रतिपादन करणारी दिसत असली तरी ब्रम्हदृष्टीने त्यांची एकवाक्यता आहे असा अर्थ . रजस्तमोगुणी दर्शनाचा आग्रह सोडल्यास शुद्ध सत्वगुणात्मक समबुद्धीने त्यांची एकवाक्यता होते , हा 'जो समता शुभ्रवर्णु' या पद समुच्चयाचा भाव आहे.
प्रपंचाला जाणणारी स्थूल दृष्टी जीवाचे ठिकाणी असते. अत्यंत सूक्ष्म अशा परब्रम्हाला जाणणारी सूक्ष्म दृष्टी किंवा चरम म्हटली जाते. परमेश्वराचे ठिकाणी एक तीच सूक्ष्म दृष्टी असते, स्थूल दृष्टी मुळीच नसते म्हणजे जीवाला जसे जगाचे भान आहे तसे ते परमेश्वराला मुळीच नाही असा भाव. ज्ञानेश्वरीत श्री माउली म्हणतात,
तो सृजी पाळी संहारी | ऐसे बोलती जे चराचरी | ते अज्ञान गा अवधारी | पंडूकुमरा ||५-८२||
जगाची हे होय जाये | तो श्द्धीही नेणे ||५-७९||
'विघ्नराज' या शब्दाने आपल्या भक्ताची परमार्थ मार्गातील विघ्ने नाहीशी करण्याचे सामर्थ्य परमेश्वराचे ठिकाणी आहे , हे दाखविले आहे..
========श्री कृष्णार्पणमस्तु ========